नाशिक – टपाल विभागात २०२२ या वर्षात कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि जेष्ठ नागरिकांसाठी अंतर्गत देवाण घेवाण आणि आर्थिक समावेशन सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रवर डाक अधिक्षक मोहन अहिरराव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या प्रणालीमुळे राज्यातील १.५ लाख टपाल कार्यालये शंभर टक्के कोअर बँकिंग प्रणालीवर येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साध्य होण्याबरोबरच ग्राहकांना नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम द्वारे खात्यांमध्ये व्यवहार करणे सोईचे होणार आहे, असेही प्रवर अधिक्षक मोहन अहिरराव यांनी सांगितले आहे. तसेच टपाल विभागांतर्गत स्थानिक स्तरावर पोस्ट खाती आणि बँक खाती यांच्यामध्ये निधीचे ऑनलाईन हस्तांतरण होणार असल्याचे शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.