नाशिक – भारतीय टपाल विभागाने अनोख्या पद्धतीने “नाशिक ग्रेप्स” विशेष पाकिटाचे अनावरण मंगळवारी नवी मुंबई रिजनच्या डाक निदेशक यांच्या प्रमुख उपस्थितीत केले. यावेळी कृषी विभागीय सहसंचालक संजीव पडवळ, अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष रवी बोराडे, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन यांच्यासह पोस्टाचे वरिष्ठ अधिक्षक मोहन अहिरराव, नाशिक टपाल संग्राहक शांतीलाल हिरण, रवींद्र वामनाचार्य, अच्युत गुजराथी,पुरुषोत्तम भार्गवे, दीपक पटेल हे मान्यवर उपस्थितीत होते. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था संभाजी चौक नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
नाशिकची ओळख असलेल्या द्राक्षे या फळाला भौगोलिक मानांकन (Geographical Indication ) मिळाल्यामुळे नाशिकचे उत्पादन असलेल्या द्राक्षे या फळाला ऐतिहासिक आणि पारंपारिक मुल्ये प्राप्त व्हावे, तसेच नाशिकचे द्राक्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी तसेच वारसा म्हणून जतन करण्यासाठीभारतीय टपाल विभागाच्या विशेष टपाल लिफाफ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि संग्राहकांच्या जगात विशेष महत्व आहे. हे लिफाफे मोजक्याच संख्येने आणि एकदाच प्रकाशित केले जातात त्यामुळे त्यांना विशेष मागणी असते. टपाल तिकिटे आणि पाकीटांचा संग्रह करणारे नागरिक आवर्जून विशेष पाकिटे खरेदी करतात, अशी माहिती नाशिक विभागाचे वरीष्ठ अधिक्षक मोहन अहिरराव यांनी दिली. यासाठी पोस्टल विभागातील अधिकारी विशाल निकम, संदीप पाटील, मनोज रुले व मनिष देवरे व नाशिक डाक विभागीय कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले.