नाशिक – नाशिक पोस्ट विभागाने पोस्टमन, डाकसेवक यांच्या माध्यमातून विभागातील सर्व टपाल कार्यालयात UIDAI च्या CELC ॲपद्वारे आधाकार्डला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्यावत करण्याची सुविध सुरू केली आहे. त्या अनुषंगाने २३ ते २८ ऑगस्ट दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक डाकघर विभागाचे प्रवर अधिक्षक मोहन शंकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकांन्वये केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, विभागातील सर्व डाक कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, या सेवेमुळे नागरीकांना आधारकार्डला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी लिंक करता येणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील सर्व नागरीकांनी जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा आपल्या भागातील पोस्टमन यांच्याशी संपर्क साधवा. तसेच मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी सर्व रहिवाशांसाठी तसेच मोठ्या आस्थापना किंवा कार्यालयांचे प्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस अद्यावत माहिती लिंक करण्याकरिता जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधवा. अधिक माहितीसाठी आयपीपीबीच्या www.ippbonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही प्रवर अधिक्षक शंकर यांनी आवाहन केले आहे.