नवी दिल्ली – २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत टपाल विभाग विशेष कॅन्सलेशन घेऊन येत आहे. हा अनोखा उपक्रम ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २०२१ साजरा करण्यासाठी हाती घेण्यात आला आहे.
योग आणि आंतराष्ट्रीय योग दिवस हे गेल्या काही वर्षांपासून टपाल उपक्रमांसाठी लोकप्रिय विषय ठरले आहेत. २०१५ मध्ये, टपाल विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दोन स्मृती तिकिटांचा संच आणि टपाल तिकिटांचे एक लघु पत्रक ( miniature sheet) जारी केले होते. २०१६ मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यनमस्कारावरील टपाल तिकिटांचा संच जारी केला होता. २०१७, मध्ये, संयुक्त राष्ट्र टपाल प्रशासनाने (यूएनपीए) न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० योगासने दाखवणाऱ्या टपाल तिकिटांचा संच जारी केला होता.