नाशिक – नाशिकमधील व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाशिकमधील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.
लॉकडाऊनमुळे नाशिकमधील व्यापार उद्योग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापार उद्योग सुरू करण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी संदर्भात महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक मधील व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने १६ मे २०२१ रोजी भुजबळ फार्म येथे अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री श्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी १३ मे रोजी झूम ऍपवर नाशिकमधील व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी मांडलेल्या विविध अडचणी पालकमंत्री भुजबळ यांच्या समोर मांडल्या. त्यात प्रामुख्याने व्यापार सुरु, व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळणे, वीज बिल, मालमत्ता कर, बँक कर्जांवरील व्याज माफ करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या गाळ्यांचे तीन महिन्यांचे भाडे माफ करणे, जीएसटी, इन्कम टॅक्स अशा विविध स्वरूपाचे कर भरण्यासाठी सप्टेंबर २१ पर्यंत मुदत द्यावी, लघु व मध्यम व्यापाऱ्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या १० टक्के रक्कम वार्षिक ३ टक्के व्याजाने कर्ज रूपाने द्यावे आदि मागण्या केल्या व व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे पालकमंत्र्यांना आवाहन केले.