इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वास्तूंचे उद्घाटन करतात ती एकतर अपूर्ण राहते किंवा निकृष्ट दर्जाची असते, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. त्याला निमित्तही तसेच ठरले आहे. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर काहीच दिवसांत एका विमानतळाचे छत कोसळल्याची घटना घडली आहे.
अंदमान निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्याच आठवड्यात विमानतळाचे उद्घाटन झाले. ७१० कोटी रुपये खर्च करून हे विमानतळ उभारण्यात आले आहे. ४० हजार ८०० चौरस मीटर क्षेत्रावर उभारलेले हे विमानतळे एकावेळी ५ लाख लोकांना सामावून घेऊ शकते, एवढी याची क्षमता आहे. पण उद्घाटन करून एक आठवडाही होत नाही तोच विमानतळाच्या छताचा एक भाग कोसळला आहे.
पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांनी ऑनलाईन उद्घाटन केले होते. या विमानतळाच्या बाहेर छत वाढवण्यात आले होते. त्यामुळे या भागामध्ये सीसीटीव्ही आणि सुशोभिकरणाचे काम सुरु होते. अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे छताच्या खाली सुशोभिकरणासाठी जोडलेला जवळपास १० चौरस मीटरचा भाग कोसळला. याबाबत विमानतळ प्रशासनाने माहिती दिली आहे.
जीवित हानी नाही पण…
छत कोसळ्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या विमानतळामुळे अंदमान आणि निकोबारच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच यामुळे केंद्रशासित प्रदेशाचा संपर्क वाढवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.