नवी दिल्ली – हे ऐकायला आश्चर्यही वाटेल आणि थोडे विचित्रही. पण सत्य आहे. एका नऊ वर्षांच्या मुलाने सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल केला आहे. निजामुद्दीन पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी त्या मुलाच्या घरी जाऊन चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या ऑपरेशन मासूम या मोहिमेत ही बाब उघड झाली आहे. या मोहिमेंतर्गत १०० गुन्हे दाखल झाले असून, ९७ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
दक्षिण पूर्व जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले, आरोपी नऊ वर्षांचा मुलगा दक्षिण दिल्लीतील एका प्रतिष्ठीत शाळेत शिकतो. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी मुलाने वडिलांच्या फोनचा वापर केला आहे. त्याने ई-मेल आयडी बनवून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. मुलाला हा व्हिडिओ कुठूनतरी मिळाला होता. मुलाचे वडील कमी शिक्षित आहे. वडील कमी शिक्षित असल्याचा गैरफायदा मुलगा घेत होता. एनसीएमईसी या अमेरिकी स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून निजामुद्दीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइट चिल्ड्रन (एनसीएमईसी) या खासगी संस्थेकडून सोशल मीडियावर देखरेख सुरू असताना ही बाब समोर आली. ही संस्था चाइल्ड पोर्नोग्राफीबद्दल सोशल मीडियावर देखरेख ठेवते. अशा प्रकारची घटना आढळली तर ही संस्था संबंधित देशांना कळवते. एनसीएमईसीने मुलाचे प्रकरण एनसीआरबीला कळविले. एनसीआरबीने ही माहिती दिल्ली पोलिसांना दिली.
दिल्ली पोलिसांतर्फे चाइल्ड पोर्नोग्राफीबद्दल मोहीम चालवण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांचे आयएफएसओ हे पथक सर्व जिल्हा पोलिसांसोबत मिळून चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात ऑपरेशन मासूम चालवत आहे. राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून आयएफएसओला बाल गुन्हे सामग्रीशी संबंधित उल्लंघनाची माहिती विशेष मिळते. एनसीएमईसीच्या देखरेखीतून ही माहिती एनसीआरबीला मिळते.