मुंबई – अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राला न्यायालयाने दणका दिला आहे. त्यामुळेच त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची पोलिस कोठडी आज संपली असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच, कुंद्राच्या गोपनीय खात्यांद्वारे महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात शिल्पा शेट्टीच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. राज आणि शिल्पाच्या संयुक्त बँक खात्याची माहिती मिळाली असून, त्यात झालेल्या व्यवहारांचा शोध सुरू आहे. याच खात्यात अश्लील चित्रपटांचा पैसा जमा होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या या संयुक्त खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात आढळले आहे. हॉटशॉट्स अॅप आणि बॉलिफेम अॅपद्वारे कमावलेला काळा पैसा याच खात्यात जमा होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेची चार सदस्यीय पथक या खात्याच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे.
पंजाब नॅशनल बँकेशिवाय राज कुंद्राचे आणखी एक बँख खाते आहे. परंतु २०१६ पासून या खात्यातून एकदाही आर्थिक व्यवहार झालेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या खात्यात कमीत कमी रक्कम ठेवण्याच्या नियमाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ जुलैला राज कुंद्राला अंधेरी येथील विआन इंडस्ट्रिजच्या कार्यालयात आढळलेल्या गोपनीय लॉकरमधून पीएनबीमधील राज आणि शिल्पाचे संयुक्त खात्याची कागदपत्रे आणि अनेक अश्लील चित्रपटांच्या स्क्रिप्ट पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्याच आधारावर तपासाला वेग आलेला आहे.
…तर शिल्पाच्या अडचणी वाढणार
या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा थेट सहभाग असल्याचा अद्याप कोणताच पुरावा मिळालेला नाही. परंतु ती राज कुंद्राचा बचाव करत आहे. राज आणि शिल्पाच्या संयुक्त खात्याच्या तपासात पोलिसांना अश्लील चित्रपटातून कमावलेल्या पैशांबाबत एखादी लिंक मिळाली तर शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढणार आहेत.