मुंबई – अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणातील आरोपी व उद्योजक राज कुंद्राची सखोल चौकशी करण्याबाबत मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा तपास आता विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) देण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लिल चित्रपट निर्मिती रॅकेट तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढवली असून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाईल. एसआयटीचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) स्तरावरील अधिकारी करणार असून ते गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देतील.
आतापर्यंत तीन वेगवेगळ्या एफआयआर आणि अनेक पीडितांकडून पोर्नोग्राफी संदर्भात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तसेच ही सर्व प्रकरणे एसआयटीकडे हस्तांतरित केली जातील. एसआयटी या प्रकरणावर लक्ष ठेवून प्रत्येक दुवा जोडून आरोपींवर कायदेशीर कडक कारवाई करेल.
राज कुंद्रा अश्लील फिल्म संबंधित प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पोलीस कुंद्राला पॉर्न फिल्मचा किंगपिन मानत आहेत. पोलिसांनी यापूर्वी कुंद्राला अश्लील चित्रपट बनवून अॅप्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्याबद्दल अटक केली असून आता आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, कुंद्राने चार वेळा जामीन अर्ज केला असून तो फेटाळला गेला. आता त्याच्या जामीन अर्जावर २० ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.