इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सासू-सुनेची आबंटगोड भांडणे दाखवणारी तू – तू मैं – मैं ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावरील ही मालिका सर्वांचीच अत्यंत लाडकी होती. त्यामुळेच ती लोकप्रिय होती. आजही ही मालिका, त्यातील या सासवा – सुनांची नोकझोक आवडीने बघितली जाते. दिवंगत अभिनेत्री रिमा लागू या मालिकेत सासूबाईंची भूमिका साकारत होत्या, तर सुप्रिया पिळगावकर या सुनेच्या भूमिकेत होत्या.
कोण होणार नवीन सासू – सून?
‘तू-तू मैं-मैं’ ही मालिका छोट्या पडद्यावर आली आणि तुफान लोकप्रिय झाली. ही मालिका संपून अनेक वर्षे झाली असली तरीही आजही प्रेक्षकांच्या मनात तिचे एक विशेष स्थान आहे. आता ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका येणार असल्याचे जेव्हापासून जाहीर झाले आहे, तेव्हापासून या मालिकेत प्रमुख भूमिकेत कोण झळकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अर्थात या मालिकेत सासूची भूमिका कोण बजावणार हे जरी नक्की झाले असले तरी अजून सून कोण साकारेल हे निश्चित झाले नाही. या शोमधील सून राधाचे आता प्रमोशन होऊन ती सासू झाली आहे. त्यामुळे आता या राधाची सून कोण असेल हे जाणून घेण्यास थोडा वेळ थांबावे लागेल.
दिग्दर्शकांनी केली दुसऱ्या भागाची घोषणा
‘तू-तू मैं-मैं’ या मालिकेचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “या मालिकेला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याची मी तयारी करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात सुप्रिया सुनेची भूमिका साकारत होती, तर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये ती सासूच्या भूमिकेत दिसेल.” २६ जुलै १९९४ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला. पहिल्या भागापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत गेलं. आता याचा दुसरा भाग लवकरच सुरू होणार आहे.
Popular TV Serial tu tu Mai Mai Coming Soon