नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासावरुन लक्ष विचलीत झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम त्यानंतरच्या परीक्षांवर झाला होता. विशेषत: फार्मसी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दोन वर्षांपूर्वी अतिशय कमी निकाल लागला होता. या विद्यार्थ्यांना संबंधित विषय महाविद्यालयांमध्ये शिकवण्यातच न आल्याने अनुत्तीर्ण विषय अजूनही त्यांना कठीण जात आहेत. याच पार्श्वभूमीवर फार्मसीच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑनची सवलत देण्यात आली आहे. तशीच अभियांत्रिकीच्याही विद्यार्थ्यांना द्यावी अशी मागणी नाशिक मध्यच्या आमदार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच हा प्रश्न सोडवण्यात येईल अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आमदार फरांदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देत थेट पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पॉलिटेक्निक, इंजिनिअरींगच्या प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी कमी मिळाला होता. शिवाय, अनेक विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहिला आहे. त्या विद्यार्थ्यांनी दुसर्या वर्षातील अभ्यासक्रम नियमित उपस्थित राहून पूर्ण केला. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना दुसरे वर्ष सोपे गेले. मात्र, पहिल्या वर्षाचा बॅकलॉग अजूनही भरून निघाला नसलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्यांना नैराश्याने ग्रासले आहे.
दुसरीकडे स्वायत्त महाविद्यालयांनी प्रथम वर्षात बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना तिसर्या वर्षात प्रवेश दिला आहे. हाच न्याय तंत्रशिक्षण संचानलयाशी संलग्न पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही मिळावा अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात राज्यातील अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडे निवेदन सादर केले आहे.
मात्र त्यावर अद्याप महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून कोणतेही परिपत्रक निघालेले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थी कॅरी ऑनच्या प्रतिक्षेत आहे. इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही या वर्षापुरता कॅरी ऑनचा लाभ मिळावा अशी मागणी आमदार फरांदे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या निर्णयाचा सकारात्मक विचार केला जाईल व लवकरच संबंधित विद्यार्थ्यांना दिलासा देऊ अशी ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे फरांदे यांनी पाटील यांचे आभार मानले.