मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची संयुक्त महाविकास आघाडी फुटण्याची चिन्हे आहे. तसे सूतोवाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. आता खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा काढण्याचं काहीच कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं विधान करण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते हे लक्षात घ्या”, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एक असले तरी सावरकरांबाबतच्या राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे मविआमध्ये धुसफूस असल्याचे म्हटले जात आहे. त्यात संजय राऊत यांनीही सूचक विधान करत काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सुरु झालेल्या राजकारणावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
“महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांवर अशाप्रकारचे आरोप करणे आणि त्यांची बदनामी करणे हे महाराष्ट्राला अजिबात मान्य नाही. शिवसेना काय तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही याचं समर्थन करणार नाहीत. राहुल गांधींनी असं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. भारत जोडो यात्रा देशातील हुकूमशाही, महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नांच्या विरोधात निघाली आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मग अशावेळी वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची काहीच गरज नव्हती. यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“वीर सावरकरांबाबत आम्हाला अभिमान आहे. इतिहासात काय घडलं आणि काय नाही घडलं ते चघळत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधी यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमची सातत्याने मागणी आहे. पण सध्या जे नवीन भाजपावाले नवे सावरकर भक्त निर्माण झाले आहेत ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी का उचलून धरत नाहीत, हे मला कळत नाही. वीर सावरकर हे भाजपाचे आणि संघाचे कधीच श्रद्धास्थान नव्हते, हे इतिहास सांगतो. पण आता राजकारणासाठी भाजपानं सावरकरांचा विषय घेतलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच वीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार केलेला आहे”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
Politics Mahahaliance Break up MP Sanjay Raut
Indication Mahavikas Aghadi Rahul Gandhi Savarkar Congress NCP