पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनधारकांला वाहन वायू प्रदुषण करीत नसल्याचे पोल्युशन अंडर कंट्रोल (पी.यु.सी ) प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य असून या तरतुदीचे पालन न केल्यास दुचाकी व तीनचाकी वाहनासाठी 1 हजार तर चारचाकी व अन्य वाहनांसाठी 2 हजार दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
वाहनाची पी.यु.सी चाचणी करुन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पी.यु.सी केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. यापुर्वीच्या पीयुसी चाचणीसाठीचे दर सन 2011 मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यात शासनाने वाढ केली असून नवीन दर पुढील प्रमाणे दुचाकी वाहनासाठी 50 रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनासाठी 100 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी वर चालणारे चारचाकी वाहनासाठी 125 रुपये तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनासाठी 150 रुपये राहील. नवीन दर 27 एप्रिल पासून लागू करण्यात आले असून वायु प्रदुषण तपासणीच्या नवीन दराची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व त्यानुसार शुल्काचे प्रदान करावे. निर्धारीत दरापेक्षा जास्त रक्कमेची मागणी केल्यास पी.यु.सी केंद्राची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे करावी, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.