लखनऊ (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री रघुराज सिंह यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबद्दल (जेएनयू) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जेएनयूमध्ये सेक्स रॅकेट (देहविक्रय व्यवसाय) चालविला जात असून, तिथे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण जाते, असे वादग्रस्त वक्तव्य करून धुरळा उडवून दिला आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधील श्रम आणि सेवायोजन राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अलिगढ येथील सभेदरम्यान माध्यमांशी बोलताना केले. रघुराज सिंह म्हणाले, की देशविरोधी शक्तींकडून जेएनयूमध्ये देहविक्रय व्यवसाय चालविला जातो. तिथे राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे मोठे नेते जातात. अभिनेत्री दीपिका पदुकोणसुद्धा तिथे जाते. यूपी सरकारमधील मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यापूर्वीसुद्धा त्यांनी मदरशांवर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले होते.
तेव्हा रघुराज सिंह म्हणाले होते, की देवाने संधी दिली तर संपूर्ण देशातील मदरशांना बंद करेन. पूर्ण देशातील मदरशांमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. या मदरशातून प्रशिक्षण घेतल्यानंतर दहशतवादी तयार होतात. त्यांचे विचारही दहशतवाद्यांसारखेच असतात.
या वक्तव्यावर वाद वाढत असल्याचे दिसताच रघुराज सिंह यांनी स्पष्टीकरण देताना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा आधार घेतला होता. ते म्हणाले होते, की कलाम साहेब म्हणाले होते की मुस्लिम व्यक्ती जन्मतःच दहशतवादी नसतात. जेव्हा ते मदरशात शिकायला जातात तेव्हा ते अनेक गोष्टींचे शिक्षण घेतात.