पाटणा – लोकजनशक्ती पार्टीचे (लोजपा) खासदार चिराग पासवान यांना पुन्हा एकदा मोठा धक्का लागला आहे. केंद्रीय अन्नप्रक्रियामंत्री पशुपती कुमार पारस यांनी चिराग पासवान यांच्या लोजपाच्या बंगला या निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगात दुसर्यांदा दावा केला आहे. त्यांचे बंगला हे चिन्ह आमचे आहे. आमच्या लोजापचे सहा खासदार आहेत. तांत्रिकदृष्ट्या चिराग हे सुद्धा आमच्याच पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे पुन्हा मागणी केली आहे. बिहारच्या पोटनिवडणुकीत आमच्याशिवाय कोणताही गट किंवा पार्टी आमच्या निवडणूक चिन्हाचा वापर करू शकत नाही, असा दावा पशुपती कुमार पारस यांनी केला आहे.
लोजपा (पारस गट) चे अध्यक्ष पारस म्हणाले, की लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी घटनात्मकदृष्ट्या लोजपा संसदीय दलाच्या नेतेपदी मलाच मान्यता दिली आहे. चिराग पासवान यांनाही आमच्याच पक्षाचे खासदार असल्याची मान्यता दिली आहे. याबाबतचे पत्रही आम्हाला मिळाले आहे. लोजपाच्या कोट्यातून केंद्रात मला मंत्रिपद मिळाले आहे. पक्षाच्या घटनेअंतर्गतसुद्धा राष्ट्रीय कार्यसमितीचे बहुमत आमच्याकडेच आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
लोजपामध्ये मोठी फूट पडली आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पशुपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतरच चिराग पासवान लोजपावर आपला दावा करत होते. पोटनिवडणुकीच्या दोन जागांवरही चिराग यांनी दावा केला होता. तारापूर आणि कुशेश्वरस्थान जागेवर होणार्या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरविणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. लोजपा तुमचाच आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, कोणतीच शंका नाही. हवे असेल तर निवडणूक आयोगाला जाऊन विचारा, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले होते. आता पशुपती पारस यांनी दावा केल्यानंतर पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.