मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. खासकरुन पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी वक्तव्य केल्याने उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. उद्धव आणि राज यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. त्यामुळेच ते एकमेकांना सतत लक्ष्य करीत असतात. आणि आता चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर राज आणि उद्धव हे एकत्र आले आहेत. राज यांच्या मनसेच्यावतीने एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये झाला हे म्हणणे चुकीचे आहे. बाबरी मशीद पाडकामाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले होते. बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता. तसेच चंद्रकांत पाटील यांनी आपण त्यावेळी व्यवस्थापन संदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये उपस्थित होतो, असेही सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळी जबाबदारी स्वीकारली, पण तिथे अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का? बाळासाहेब गेले होते का? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्या दिवशी घडलेला प्रसंग देखील त्यांनी या वेळी सांगितला. उद्धव यांच्या वक्तव्याला राज यांनी एक व्हिडिओ शेअर करत दुसरा दिला आहे. चंद्रकांत दादा यांनी बाबरीच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले असून आहे. तर उद्धव ठाकर चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर चांगलेच आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुजोरा देण्यात आला आहे. ठाकरे बंधू यांच्यामधील वाद टोकाचे आहेत. मात्र कुटुंब अडचणीत असताना एकमेकांना सहकार्य करतात, असे अनेक वेळा दिसून आले आहे. आता देखील दोघे ठाकरे बंधू पुन्हा या घटने संदर्भात एकत्र आल्याचे दिसून येतात.
अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी सन्मा. राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा ! pic.twitter.com/6AwTnGRdo2
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 11, 2023
Politics Uddhav Thackeray Raj Thackeray Video