मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर आणि समान नागरी संहिता कायद्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मणिपूर जळतंय. तेथे नागरिक जीव मुठीत धरुन रहाताय आणि पंतप्रधान मणिपूरला जात नसून ते अमेरिकेला जात आहेत. भाजप जर देशात गोहत्याबंदी कायदा लागू करू शकत नसेल तर समान नागरी कायदा कसा लागू करणार, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.
शिवसेना (उद्धव गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीला संबोधित केले. ठाकरे म्हणाले की, मणिपूर जळत आहे. तिथे हिंसाचार उसळला आहे. मात्र तिथे जाण्याऐवजी पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. राज्यात सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले नाहीत. आपण रशिया-युक्रेन युद्ध शांत केल्याचा दावा पंतप्रधान करतात, मग ते मणिपूरमधील हिंसाचार का थांबवत नाहीत. जर पंतप्रधानांनी राज्यात शांतता प्रस्थापित केली तर आपण त्यांच्या दाव्यावर विश्वास ठेवू शकतो, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या अंतर्गत पाटणा येथे होणाऱ्या बैठकीला आपणही उपस्थित राहणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. २३ जून रोजी होणारी बैठक ही केवळ विरोधी पक्षांची बैठक नसून ती देशावर प्रेम करणाऱ्या लोकांची सभा आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे आणि लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या लोकांची सभा आहे. देशभक्तांची बैठक आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार स्वतः मातोश्रीवर आले होते. नितीशकुमार यांनी मला बैठकीसाठी बोलावले. पूर्वी फक्त भाजप नेते मातोश्री यायचे. आता भाजप वगळता सर्व नेते मातोश्रीवर येतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
जम्मू-काश्मीरबाबत ठाकरे म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी राज्यातून कलम ३७० हटवण्यात आले होते. पण तिथे आजवर निवडणुका का झाल्या नाहीत? आजही तिथे हिंदूंना धोका का आहे? त्याचवेळी, समान नागरी संहितेबाबत ते म्हणाले की, जर ते देशात गोहत्येविरोधातील कायदा लागू करू शकत नसतील, तर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी कशी होणार. विधी आयोगाने अलीकडेच यावर विचार करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये धार्मिक आणि सामाजिक संघटनांचे लोक सहभागी होतील.