मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक तिथे नव्हता, असा आरोप करणारे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पाटील बाबरी पडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. चंद्रकांत पाटील काल बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्यावरून सध्या राजकारण जोरदार तापले आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला डिवचल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, बाबरी पाडण्यासाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी या तीन संघटनांचे कार्यकर्ते पुढे होते. शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता. संजय राऊत सतत या विषयावर बोलत असतात. पण ते तिथे होते का, हा प्रश्न आहे.’ पाटलांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. त्यांनी पाटलांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे तर आम्ही बाबरी पाडली म्हणून थेट सांगत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मशीद पाडणारे मराठीत बोलत होते, असे सांगितले आहे. मुंबईतली दंगल असो वा बाबरी असो शिवसैनिक पुढे येऊन लढले आहेत. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. त्यामुळे विषय श्रेय घेण्याचा नाही. हा शिवसैनिकांचा अपमान आहे. ही भाजपची चाल आहे. त्यामुळे पाटलांचा राजीनामा नको, त्यांची हकालपट्टीच करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
स्वतःला जोडे मारून घेणार का?
जे स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणवून घेतात त्यांना हे सहन होणार आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील आमदारांकडे होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवून घेणारे त्यांना जोड्यांनी मारणार आहेत की स्वतःला जोडे मारून घेणार आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे.
Politics Uddhav Thackeray on Eknath Shinde Chandrakant Patil