मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने दिलेले मशाल चिन्ह ठाकरे गट स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती आहे. परंतु, मशाल हेच चिन्ह मिळावे तसेच पक्षाचे नवीन नाव यासाठी पुन्हा प्रक्रिया करावी लागणार आहे. एकुणच आयोगाच्या निर्णयाने ठाकरेंपुढे प्रश्नच प्रश्न उभे केले आहेत.
तीन दशकांपासून शिवसेनेची ओळख, शिवसेनेची अस्मिता असलेले धनुष्यबाण तर ठाकरेंकडून हिरावले गेले. पण, आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाही. ठाकरेंच्या पक्षाला नव्या नावासाठी, नव्या चिन्हासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. चिन्हाबाबत वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला दिलेलं मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तात्पुरते होते. काल दिलेल्या निकालात आयोगाने स्पष्ट म्हटलं आहे की हे तात्पुरते नाव, चिन्ह कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक संपेपर्यंतच त्यांना वापरता येईल. पुन्हा मशाल मिळवण्यासाठी, नव्या पक्षाच्या नावासाठी त्यांना नव्याने प्रक्रिया करावी लागणार आहे.
मशालवर विजय
काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे ठाकरे गटाला मशाल तात्पुरते निवडणूक चिन्ह म्हणून मिळाली होती. त्या चिन्हावरही त्यांनी अंधेरीची पोटनिवडणूक जिंकली होती. त्यामुळे ठाकरे गट मशाल चिन्ह स्वत:कडे ठेवण्याच्या विचारात आहे. मात्र, त्यांच्या या मनसुब्यावर पाणी फेरण्याचे काम २००४ पासून सुप्तावस्थेत असलेला समता पक्ष करण्याची शक्यता आहे. मशाल हे चिन्ह जॉर्ज फर्नांडिस यांच्या काळापासून आमचे आहे. तेव्हा ते ठाकरेंना देऊ नये, अशी विनंती पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
तात्पुरत्या चिन्हासाठीही वाद
काही दिवसांपूर्वी तात्पुरते चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठीही शिंदे-ठाकरे गटात संघर्ष झाला होता. त्रिशूळ, उगवता सूर्य हे पर्याय दोघांनीही दिल्याने बाद झाले होते. दरम्यान मशालीबाबत आधीच थोडा प्रचार करून झाला आहे. त्यामुळे तेच कायम राहिले तर ठीक नाही तर ठाकरे गटाला पुन्हा शून्यापासून सगळी सुरुवात करायला लागू शकते.
Politics Uddhav Thackeray New Party Name Symbol