मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्यांनी माझी साथ सोडली ते माझ्याकडे परत येणार नाहीत आणि त्यांच्यात परत येऊन माझ्यापुढे उभे राहण्याची हिंमतही नाही, असे रोखठोक मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सोडून गेलेल्या शिवसैनिकांवर आपला संताप व्यक्त केला.
देशात ‘इंडिया’ या नावाखाली भाजपविरोधात विरोधीपक्षांनी एकत्र येणे हे महाविकास आघाडीचे यश असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. महाविकास आघाडीचे भवितव्य विचारले असता ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीला काहीही फरक पडलेला नाही. उलट आघाडीची बाजू आणखी बळकट झाली आहे. विस्तारही होणार आहे. त्याच प्रेरणेतून देशात इंडियाच्या नावाने विरोधीपक्ष एकत्र आले आहेत. याची सुरुवात महाराष्ट्रात झाली.’
विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्याबद्दल कौतुकाचे शब्द त्यांनी काढले. ‘राहुल गांधी अत्यंत समजूतदार आहेत. ते ऐकून घेतात, समजून घेतात. ते हिंदूंचा राग करतात, असे त्यांच्याबद्दल पसरविण्यात येते. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. अतिशय शांतपणे ते आपल्या सूचना सर्वांपुढे मांडतात,’ असेही ते म्हणतात. भाजप देशात चुकीचा पायंडा पाडत असल्याचेही ते म्हणाले. ‘जनतेने कुणालाही मत दिले तरीही आम्हीच सत्तेत येणार, हा चुकीचा पायंडा भाजप पाडत आहे. माझी लढाई मोदींच्या विरोधात नसून हुकुमशाहीच्या विरोधात आहे. कारण हीच परिस्थिती राहिली तर उद्या कुणीही बंदूक घेऊन येईल आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल,’ अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
राजबद्दल काय म्हणाले?
राज ठाकरे यांच्याकडून प्रस्ताव आला तर काय भूमिका असेल, असे विचारले असता जर तर च्या गोष्टींना काही अर्थ नाही, असे मत त्यांनी दिले. ‘या चर्चांना काही आधार असता तर चर्चा कधीच थांबली नसती. शिवाय प्रस्ताव आला तर गेला तर यावर मी विचार करत नाही. आला तरी विचार करत नाही, गेला तरी विचार करत नाही. ज्या क्षणाला विषय येतो, त्या क्षणाला विचार करतो,’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.