मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा)चे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, विधान भवनाबाहेर येताच ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीचे कारण सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे गट-भाजप यांचे सरकार सत्तेत आले. या घडामोडीला वर्ष पूर्ण होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली. अजित पवार यांच्या नेतृत्वात बहुसंख्य आमदारांनी बंड केले. पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे ते आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत. या सर्व घडामोडींनंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे विधान भवनात आले. आणि त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली.