यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राजकीय पक्ष फोडण्याचा ट्रेंड जोरात आहे. शिवसेनेला फुटून वर्ष होत नाही तोच राष्ट्रवादीत फुट पडली आहे. या एकुणच प्रकारावर उद्धव ठाकरेंनी हल्ला चढविला आहे. ‘आधी पक्षातील लोकं फुटायचे आता पक्ष पळवला जातोय,’ असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यादरम्यान ठाकरेंनी पक्ष फोडाफोडीवर घणाघात केला. सध्याची राजकीय परिस्थिती जशी दिसतेय तशी पाहतोय. राजकारणात फोडाफोडीचे प्रकार काही नवीन नाहीत. पण यापूर्वी पक्ष फोडला जात होता, मात्र आता पक्ष पळवला जात आहे. विशेष म्हणजे, पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत माझ्या ज्या काही सभा झाल्या, तसेच इथे येताना रस्त्यात जागोजागी लोकं थांबलेली होती. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर लोकं येऊन सांगत आहे की, जे काही घडतंय ते वाईट आहे. ही परंपरा, पायंडा महाराष्ट्रासाठी वाईट आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे लोकं सांगत, असल्याचे ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले की, मी आता जे काही राज्यभर फिरत आहे, त्यात जाहीर सभेचा आग्रह धरलेला नाही. पण गेल्या वर्षभरात राज्यभरातील आणि राज्याच्या बाहेरचे शिवसैनिकांसह पदाधिकारी वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळेला येऊन मला भेटत आहे. त्यामुळे मी असं ठरवलं आहे की, सध्या पावसाळा सुरु असून, ग्रामीण भागातील बहुतांश शिवसैनिक शेतकरी आहे. त्यामुळे सध्या जाहीर सभा वैगरे न घेता, मी माझ्या कार्यकर्त्यांना भेटत आहे.कार्यकर्त्यांकडे जाऊन थेट त्यांना भेटण्याचा माझा उद्देश आहे. तसेच त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी समजून घेता आल्यातर त्या समजून घेण्याचा प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,‘सुप्रीम कोर्टाने जो अर्थ काढून दिला आहे त्याच्या पलीकडे कोणालही पाहता येणार नाही. न्यायालयाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात त्यांचा निकाल दिला आहे. त्या निकालच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. जर त्यांनी त्या चौकटीच्या बाहेर निर्णय दिला तर ते लोकशाहीला धरून होणार नाही.’