मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समान नागरी कायदा आणण्यासाठी केंद्र सरकार उत्सुक आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आपापली भूमिका स्पष्ट करत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्याला पाठींबा दिला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे समान नागरी कायद्याला समर्थन होते. तेव्हा त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेत उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला समर्थन दिले आहे. परंतु, असे करत असतानाच स्वत:चा ठाकरी बाणा त्यांनी जपला आहे. या कायद्याचा मसुदा जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत यासंदर्भात अधिकृत निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे राज्यात महाविकास आघाडी तुटणार की राहणार, असा पेच उद्धव ठाकरेंपुढे असताना दुसरीकडे मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आणलेल्या समान नागरी कायद्याला समर्थन द्यावे की नाही, अशा द्विधामनस्थितीतून उद्धव ठाकरे यांचा प्रवास सुरू आहे. राज्यातील नवीन सत्ता समीकरणामुळे त्यांनी मविआतून बाहेर पडण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. तर काहींनी राज-उद्धव एकत्र येणार असल्याचे अंदाज बांधले आहेत. अशात उद्धव यांनी समान नागरी कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या अधिवेशनात हा कायदा यावा, यासाठी केंद्र सरकार उत्सुक आहे. अशात उद्धव ठाकरे यांचे समर्थन महत्त्वाचे मानले जात आहे. नुकतीच समान नागरी कायद्यासंदर्भात ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.
लवकरच महाराष्ट्र दौरा
सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. सर्व नेत्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी या बैठकीत आमदार खासदार आणि इतर नेत्यांची मते जाणून घेऊन आपण यापुढे महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचा निर्णय ठाकरे गटाकडून या बैठकीत घेण्यात आला.