मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर आणि पक्षातील नेते शिंदे गटात जाण्याचे प्रकार सुरूच असताना आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जुलैपासून ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. ठाकरे हे सर्वप्रथम विदर्भात जाणार आहेत. त्यानंतर ते राज्याच्या सर्वच भागांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात राज्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवाय ठाकरे गटाला गळती सुरूच आहे. शिंदे गटात विविध नेते दाखल होत आहेत. पक्षातील बंडखोरीनंतर राज्यस्तरीय दौरा करण्याचे उद्धव यांनी जाहीर केले. पण, त्यांचा हा दौरा होऊ शकलेला नाही. आता मात्र, त्यांनी या दौऱ्याची घोषणा केली आहे.
असा आहे विदर्भ दौरा
उद्धव ठाकरे हे रविवार, ९ जुलै रोजी सकाळी यवतमाळला जाणार आहेत. सर्वप्रथम ते पोहरादेवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यापाठोपाठ ते वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दोन्ही बैठकांनंतर ते यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद सधणार आहेत. सोमवार, १० जुलै रोजी ते अमरावती, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
शरद पवारही मैदानात
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात ३५ आमदारांनी बंड केले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी थेट जनतेमध्ये जाण्याचे घोषित केले आहे. शरद पवार यांच्या राज्यस्तरीय दौऱ्याला आज नाशिक जिल्ह्यातील येवला येथून प्रारंभ होत आहे. बंडखोर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातून पवार यांचा दौरा सुरू होत आहे.
राजकीय घडामोडी
शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष प्रमुखांनी राज्यस्तरीय दौरा पावसाळ्यातच आयोजित केल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आपल्या पक्षाची ताकद वाढवतानाच अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.