मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. ठाकरे यांची लवकरच एक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा टीझर आज प्रसारीत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा होत आहे.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार गेल्या वर्षी कोसळले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तब्बल ४० आमदारांनी बंड पुकारले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. यास वर्ष होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्वात ३० आमदारांनी बंड केले आहे. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तारुढ आहे. राज्यातील या राजकीय भूकंप आणि हालचालींचे विविध परिणाम पहायला मिळत आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारीत होणार आहे.
शिंदेंच्या नेतृत्वातील बंडखोरांनी खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप ठाकरे यांच्यावर केला. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. त्यामुळे निधी मिळत नव्हता यासह अनेक प्रकारची नाराजी शिंदे गटाने व्यक्त केली. मात्र, आता अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्याकडे अर्थ खाते आले आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका होत आहे. यासह विविध बाबींवर ठाकरे हे काय भाष्य करणार, कुठला गौप्यस्फोट करणार याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.