अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौरा सुरू केला आहे. अमरावती येथे त्यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर हल्ला चढविला. ‘मी घरी बसलो होतो पण घरफोडी केली नाही’, असे म्हणत ठाकरे यांनी त्यांच्यावर घरकोंबडा असा आरोप करणाऱ्यांना उत्तर देत मुश्रीफ यांनाही टोला लगावला. खास ठाकरी शैलीतील त्यांच्या टीकेने राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्यावर टीकेची झोड उठविली. शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर हल्ला करत असतानाच त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही सोडले नाही. ‘घरफोडे तुम्ही आहात. मी घरात बसून जे काम केले, ते तुम्हाला घर फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जावं लागत आहे. सरकार आपल्या दारी म्हणता, पण तुम्हाला कोणी दारातही उभे करत नाही. मग अंगणवाडी सेविकांना बोलवता, पोलिसांना साध्या कपड्यात बसवता, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शासन आपल्या दारी या उपक्रमावर जोरदार प्रहार केला.
ठाकरेंनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र आणि राज्य सरकावरही निशाणा साधला. निवडणूक आयोग आणि शिंदे गटालाही अमरावतीतील भाषणात लक्ष्य केले. यावेळी नुकतेच मंत्री झालेल्या हसन मुश्रीफ यांचे उदाहरणही ठाकरेंनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता.
तर, गेल्या काही महिन्यात ईडी व आयटीच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा हसन मुश्रीफ यांच्या घर कार्यालयावर छापा टाकत चौकशीही केली होती. त्यावेळी, मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी आक्रमक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना. ‘तुम्ही सगळे शांत राहा. ईडीच्या अधिकान्यांना सांगा आम्हाला गोळ्या घालून जा’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. यावेळी सायरा यांच्या डोळ्यात पाणी होते. अमरावतीतील भाषणात उद्धव ठाकरेंनी या प्रसंगाची आठवण सांगत आज तेच हसन मुश्रीफ भाजपासोबत सत्तेत जाऊन बसल्याचे म्हटले.
भाजपला भीती म्हणून फोडाफोडी
जगभरातील नंबर १ चे पंतप्रधान असतानाही पक्ष का फोडताय, शिवसेना फोडली, शिवसेना चोरली आज राष्ट्रवादी चोरताय. भाजपावर ही वेळ का आली, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच, सत्तेची मस्ती असल्याने मनात भीती आहे, आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून समोर कोणी ठेवायचे नाही सोबत घ्यायचे राजकारण सुरू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.