नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे सांगत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड झाली आहे. आपण लढत आहोत. वेदांत फॉक्सकोन गुजरातला गेला, तिथून रद्द झाला, यात देशाचे नुकसान झाले. यात महाराष्ट्र रोजगार गेला. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेल्याचे सांगत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्र मध्येच राहिले असते असेही त्यांनी सांगितले.
आज आदित्य ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी शहरातील सातपूर परिसरात पदाधिकारी मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या चाळीस आमदारांवर सडकून टीका केली. एकीकडे राज्यात फोडाफोडीचे राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. यावेळी ते म्हणाले की, खोके सरकार फक्त घोषणांचे सरकार असून घोषणा दिल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटतं. मात्र सद्यस्थितीत साफ आणि स्वच्छ विरुध्द गद्दारी असे राजकारण सुरू आहे. जगात महाराष्ट्राचे नाव होतं, तो महाराष्ट्र कुठे नेवून ठेवला आहे. राजकारणची दलदल झाली असून आता कोण कोणाचे होर्डिंग्ज लावतो, कोण कोणाचे फोटो, लावतो ते समजत नाही.
ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही भोळे आहोत. उद्धव साहेबांना आणि मला राजकारण कळत नाही. आमचा हा गुण आहे की अवगुण आम्हाला फोडाफोडीचे राजकारण जमत नाही, असे सांगत त्यांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली. ४० बंडखोर पुन्हा निवडून येणार नाही. जनतेत त्यांच्या विषयी प्रचंड राग आहे. जनता त्यांना धडा शिकवेल. आपण सर्व सोबत आहात. आपण नक्कीच लढू आणि जिंकू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राज्यात फोडाफोडीच राजकारण सुरु असून त्यातच नेते व्यस्त आहेत. यामुळे नुकसान देशाचे व महाराष्ट्राच होत आहे. लाखो तरुण तरुणी ते सगळे रोजगाराच्या संधीसाठी फिरत आहेत, आपल्या राज्यात प्रकल्प नसल्याने तरुणाना नोकरी नाही, शेतकऱ्यांचा, तरुणांचा आवाज ऐकणारे कोणी नाही, महाराष्ट्राला पुढे येऊ द्यायचं नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी केली. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु असून महिलांवर अत्याचार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.