मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. तेथील महापालिका तसेच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथील जनहिताय कामे थांबली असून याबाबत भाजपच्याच नेत्यांनी तक्रार केल्याचा प्रकार पुढे आला आहे.
राज्याच्या सत्तेत भाजप जरी ज्येष्ठ बंधू असला, तरी ठाणे जिल्ह्यात मात्र शिंदेशाहीचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यामार्फत आलेल्या कामांना दुय्यम स्थान दिले जाते. जिल्ह्यातील सर्वच महापालिका, नगरपालिका, तहसील, पोलिस यंत्रणा या ठिकाणी हा अनुभव येत असल्याने, मंत्री चव्हाण यांच्याकडे माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर राहुल दामले, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, आमदार गणपत गायकवाड, ठाण्याचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदींनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपच्या माजी नगरसेवकांच्या शब्दाला विरोधी पक्षाच्या माजी नगरसेवकांसारखे डावलले जाते, अशा तक्रारी भाजपच्या बैठकीत उघडपणे केल्या गेल्या. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या फायली झटपट पुढे सरकतात, त्यांच्या प्रभागात गटारे, पायवाटा, सिमेंट काँक्रिट रस्ते, सुशोभीकरण अशी सर्व विकासकामे वेगाने होत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांना खटकत आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने (विनामूल्य) पोलिस संरक्षण मिळते. मात्र, भाजपसह अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधींना पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागतात.
बांधकाम व्यावसायिकांचे नवनव्या इमारतींचे प्रस्ताव शिंदे गटाचे शिवसैनिक पाठवितात ते झटपट मंजूर होतात, अशी ओरड भाजप कार्यकर्ते करतात. भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यक्षेत्रात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याकरिता शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी पुढाकार घेतल्याने आयलानी यांचे समर्थक अस्वस्थ आहेत.
निधी वाटपाचा फॉर्म्युला
अंबरनाथ शहरामध्ये निधीचे वाटप करताना शिवसेना शिंदे गटाला ६० टक्के, तर भाजपला ४० टक्के निधी देण्याबाबत अलिखित नियम करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे जिल्हा नगरोत्थान योजना असो की, शासनाच्या कोणत्याही योजना असो; त्या योजनांसाठी प्रस्ताव पाठविला, तर निधी वाटपाचा हाच फॉर्म्युला निश्चित केला आहे.
Politics Thane BJP Shinde Group Issues