मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरे गटात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या विधानपरिषदेच्या सदस्या आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात जाणार आहेत. ठाकरे गटाच्या आक्रमक वक्त्यांपैकी एक असलेल्या कायंदे यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
लोकसभा निवडणुका जवळ येत असतानाच सर्व पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. जागा वाटपाचे गणित सुरू झालेले आहे. पक्षातील इनकमिंग वाढविण्यावर प्रत्येकाचा भर आहे. अशात शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का देत कायंदे यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे. मनीषा कायंदे या गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या. त्यामुळे त्या पक्षातून जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काहींनी त्या ठाकरे गटाला सोडणार नाहीत, असादेखील दावा केला होता. मात्र, आता कायंदे शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. कायंदे या भाजपकडून २००९ ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१८ मध्ये त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती.
ठाकरे गटातील आउटगोइंग सुरूच
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून जोरात आइटगोइंग सुरू आहे. याचा लाभ शिंदे गट घेत आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद मिळून मोजकेच आमदार ठाकरेंकडे आहेत. ठाकरेंकडे असणारे आमदार हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करू लागल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. कायंदे शिंदे गटात जात असतानाच शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. चुनाभट्टीतील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तांडेल दाम्पत्यानेही ठाकरे गट सोडला आहे.