बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाच्या झंझावाती नेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याची बातमी पुढे आली आहे. त्यांना मारहाण करणाऱ्यानेच खुद्द याचा दावा केला आहे. पण सुषमा अंधारे यांनी आपल्याला कुठलीही मारहाण झालेली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराची दखल घेत जिल्हा प्रमुख अप्पा जाधव यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
ठाकरे गटावरील संक्रांत काही संपलेली नाही. एकीकडे पदाधिकारी, नेते साथ सोडून शिंदे गटात सामील होत आहेत, तर दुसरीकडे पक्षात असलेले पदाधिकारीच एकमेकांसोबत भांडत आहेत. भाजप आणि शिंदे गटाचा सामना करायचा, महाविकास आघाडीची वज्रमुठ साबूत ठेवायची की आपल्या गटातील नेत्यांची भांडणं सांभाळायची, असा मोठा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यात सध्या सुषमा अंधारे महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन जोरदार भाषणे ठोकून येत आहेत. अंधारे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचे बीडमधील नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यांची जोरदार भांडणं झाली. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या. याबाबतचा दावा अप्पा जाधव यांनी स्वत: केला आहे. अप्पा जाधव यांनी व्हिडियो शेअर करून अशी माहिती दिली आहे. असे असेल तर सुषमा अंधारे यांनी पोलिसांत तक्रार का दिली नाही, किंवा त्यांच्या समर्थकांनी तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय का पोहोचवला नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अंधारे यांच्या नेतृत्वात बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा होणार आहे. याठिकाणी खासदार संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची भाषणे होणार आहेत. यात्रेच्या आधीच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. पण त्यांचा हा आरोप सुषमा अंधारे यांनी फेटाळला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे म्हटलं आहे.
पाहणी करताना वाद
बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरात सभेच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते गेले होते. तिथे शिवसैनिकांमध्ये वाद झाल्याचे कळते. उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून हा वाद विकोपाला गेला. सुषमा अंधारेंसमोरच हा वाद झाल्याने काही काळ गोंधळ झाला होता. मात्र सुषमा अंधारे यांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला.
जाधव काय म्हणतात?
अप्पासाहेब जाधव यांनी व्हिडियो शेअर करून आपण सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा केला आहे. या व्हिडियोमध्ये ते म्हणतात की, सुषमाताई अंधारे जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या.’
ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारेंना मारहाण? pic.twitter.com/hEusvwCWgN
— Ravindra Mane (@i_am_Ravindra1) May 18, 2023
Politics Thackeray Group Clashes Sushma Andhare