मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘खरी शिवसेना कोणती’ यावरुन राज्यात सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद सुरु आहेत. दोन्ही बाजूंकडून दावे – प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे, शिंदे गट आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशदेखील होत असून, आपली बाजू भक्कम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. आता बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. आता दसरा मेळाव्यापूर्वी शिंदे गट उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.
शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने संघर्षाची परिस्थिती आहे. आता शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनीदेखील धुळ्यातील सभेत बोलताना मोठा दावा केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सहभागी होतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गणेशोत्सवाच्या काळात एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणेश दर्शन आणि आरतीसाठी गेले होते.
“गुलाबराव पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत मात्र त्यांचा संवाद कायम आहे. एकनाथ शिंदे गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी पोहोचले होते. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवलं होतं, त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता.
नार्वेकर हे उद्धव यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. उद्धव यांचे स्वीय सहायक म्हणून ते काम पाहतात. त्यामुळे उद्धव यांचे अनेक डावपेच आखण्यात त्यांची भूमिका मोलाची असते. जर नार्वेकरच फुटले तर उद्धव यांना मोठा शह देता येणार आहे. त्यामुळेच शिंदे गटाने नार्वेकर यांना आपल्याकडे खेचण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावल्याचे बोलले जात आहे. नार्वेकर हे उद्धव यांची साथ सोडणार का याबाबत विविध चर्चा आणि मतभेद आहेत. मात्र, प्रत्यक्षात काय होते हे नजिकच्या काळातच स्पष्ट होणार आहे.
अत्यंत विश्वासू सेवेकरी थापा
एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चंपासिंग थापा यांची ओळख होती. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे, त्यावेळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे उभे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी मातोश्रीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात आहे. याचबरोबर बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.
Politics ShivsenaUddhav Thackeray Eknath Shinde War