नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह कुणाचे, यावरील तातडीच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले असून त्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. अशात या प्रकरणावरील तातडीच्या सुनावणीला नकार देऊन कोर्टाने ठाकरे गटाला धक्का दिल्याची चर्चा आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच यावेळी ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात केलेल्या सुनावणीत हे प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवले आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. येत्या निवडणुका पाहता ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळावे यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे असलेल्या प्रलंबित १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात शिंदे गट तोंडाशी पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात सुप्रीम कोर्टाने दिलेला नकार ठाकरे गटाला मोठा धक्का मानण्यात येत आहे.
ठाकरे गटापुढे पेच
शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी निकल दिला. आयोगाने शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
politics shivsena uddhav thackeray supreme court
party symbol