मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘जखमी वाघ कधीही गप्प बसत नाही असे म्हटले जाते, सध्या राजकारणात देखील असेच घडत आहे, असे दिसून येते. एकीकडे शिंदे गट सत्तेत देऊन प्रबळ होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील आता आगामी काळातील विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसली आहे, असे दिसून येते. त्यासाठी त्यांनी मिशन ४० ची योजना आखली आहे. कोणत्याही परिस्थितीत बंडखोर आमदारांना पराभूत करण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न करण्याचे ठरवले आहे, असे दिसून येते. त्यासाठी ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात जणू दंड थोपटले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पारंपारिक मित्र भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्री पद स्वीकारले. त्यानंतर अडीच वर्षाच्या काळात अनेक अंतर्गत आणि गुप्त घडामोडी घडत होत्या. शिवसेनेमध्ये त्याचे रूपांतर असंतोष आणि बंडाळीत झाले. त्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडत राजकीय भूकंप घडून आणला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सहाजिकच मूळ पक्षाला घरघर लागली. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकाला शह देण्याची जय्यत तयारी सुरू आहे.
सध्या ठाकरे-शिंदे वादात शिवसेना नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे दोन वेगळे गट पक्षात पडले आहेत. मात्र खरी शिवसेना कोणाची? हा वाद अद्यापही निवडणूक आयोगाच्या कक्षात आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा सुप्रीम कोर्टात असून दि.२९ नोव्हेंबरला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. यावेळी काय निकाल लागेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कदाचित सध्याचे शिंदे फडणवीस सरकार बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते. त्यानंतर विधानसभेच्या माध्यमातून निवडणुका देखील होऊ शकतात. त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.
दुसरीकडे आगामी काळात महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे ठाकरेंनी जिंकण्याची प्रतिज्ञा घेतलेली असून शिंदे गटाला पराभूत करण्याचा मोठा डाव आखला आहे. एकंदरीत सर्वच निवडणुकीची ठाकरे गटाकडून आत्तापासून तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील युद्ध पातळीवर कामाला लागले आहेत. मातोश्रीवर रोज बैठका आयोजित केल्या जात आहेत.
इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरुवातीपासून आतापर्यंत असलेले सर्व नेते पदाधिकारी यांनी कार्यकर्ते देखील चांगलेच संत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे.विशेषतः विधानसभा मतदारसंघनिहाय
यांच्यासह त्यांच्या ४० आमदारांना मतदारसंघात पाडण्यासाठी सर्वांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा देखील घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच नुकसानीची पाहणी केली असून आदित्य ठाकरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील नाशिक जिल्ह्याचा दौरा करत येथील शेतीचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची भेट घेऊन आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत असे सांगितले.
मातोश्रीवर रोजच्या रोज राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. तसेच मागील निवडणुकीतील आकडेवारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करत याठिकाणी पुढील निवडणुकीत कुणाला उभे करायचे याचा देखील आढावा घेतला जात आहे. महत्वाचे म्हणजे कट्टर शिवसैनिकाला पुढे आणून बंडखोरांविरोधात उभे करण्याची योजना उद्धव व आदित्य ठाकरे आखात आहेत.
मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातील प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर सोपवली आहे. केवळ मतदारसंघातच नव्हे तर स्थानिक बूथ पातळीवर हा आढावा घेतला जात आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री काळात केलेली कामे, विरोधकांच्या धोरणांमुळे राज्यातील प्रकल्प इतर राज्यात गेल्याचा मुद्दा असे अनेक विषय आगामी काळात पुढे आणले जाणार आहेत. आगामी काळातील कोणतीही निवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी सोपी नाही, कारण त्यांच्यापुढे शिवसेनेचा बंडखोर ४० आमदारांचा शिंदे गट राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेला भाजप सारखा बलाढ्य पक्ष आणि त्याला साथ देणारा मनसे असे मोठे आव्हान असणार आहे, त्यामुळे पुढे काय घडते याची सर्वांना उत्सुकता आहे.
Politics Shivsena Uddhav Thackeray Group Strategy