मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सद्यस्थिती आणि शिवसेना पक्षासह अन्य बाबींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक आसूड ओढले आहेत. ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टमध्ये ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘शिवसेना’ हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला पुन्हा मिळेल, असा ठाम विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. सत्ता आल्यावर मोदींनी सर्व घटक पक्षांना हीन वागणूक दिली. आता निवडणूक आली म्हणून त्यांना जवळ करीत आहेत. गेल्या १० वर्षात ठोस काम केले नाही म्हणूनच त्यांना प्रादेशिक पक्षांची आठवण झाली. आपल्या स्वतःच्या नावावर आणि गेल्या १० वर्षाच्या कामावर आपण पुन्हा सत्तेत येणार नाही, याची जाणिव त्यांना झाली आहे. आता त्यांनी ३६ पक्षांना एकत्र केले आहे. खरं म्हणजे त्यांना एवढे पक्ष एकत्र आणण्याची गरज नव्हती. त्यांच्या एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या मुलाखतीत त्यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला आहे. जी माणसे मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच असे त्यांनी स्पष्ट केले.