मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राज्यात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला एक-एक कार्यकर्ता फोडा, असा टोमणा वजा आव्हान दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता एकमेकांवर पुन्हा आगपाखड सुरू झाली आहे.
भाजपने राज्यात पक्षफोडीचा नवीन अध्याय सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी असे दोन मोठे प्रादेशिक पक्ष फोडण्यात भाजपला यश आले आहे. फडणवीस यांच्या या राजकारणाने अनेकांना जेरीस आणले आहे. काहींनी ही राज्याची राजकीय संस्कृती नाही, अशी टीका केली आहे. तर काहींनी थेट शरद पवार यांनी देखील असेच राजकारण केल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने दौरे, सभा करताहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे येथे उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. अशात त्यांनी शिंदे-फडणवीसांना कार्यकर्ता फोडण्याचे आव्हान दिले आहे. मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्तांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, २००७ साली असंच वातावरण होतं. यावेळी महापालिकेत जिंकणार की हारणार अशी परिस्थिती होती. मात्र सर्वांच्या साथीने तिथेही आपण जिंकलो. यावेळी आनंदाने काही महिलांना अश्रू आनावर झाले होते. या आश्रूंनी ज्यांना ज्यांना मोठं केलं त्यांना अजिर्न झालं आणि ते निघून गेले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.
गद्दारांना गाडायचे आहे
आपल्याला गद्दारांना गाडायचे आहे. त्यामुळे मी शिंदे आणि भाजपला सांगतो की, दर आठवड्याला एक माणूस फोडा, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावलाय. तसेच पुढे ते म्हणाले की, जे कामाचे नाहीत ते जातील. त्यामुळे शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील.