मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार संजय राऊत संपादक असलेल्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात प्रकाशित झालेल्या एका बातमीमुळे उद्धव ठाकरे अडचणीत आले असून आता न्यायालयाने त्यांच्याविरोधात समन्स जारी केले आहे. वत्रमानपत्रात खोटी बातमी प्रकाशित केल्याचा ठपका दोघांवरही लावण्यात आला आहे.
शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत पक्षासाठी खूप काम केले आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर शेवाळे यांनी शिंदे गटाची वाट धरली. त्यानंतर सामनामधून त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय असल्याचा आरोप करत त्यांचे पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यामुळे शेवाळेंना त्यांच्या निकटवर्तीयांकडून विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. २९ डिसेंबर २०२२ रोजी सामना या मुखपत्राच्या हिंदी आणि मराठी आवृत्तीमध्ये प्रकाशित एका लेखात राहुल शेवाळे यांच्या संदर्भात ही वादग्रस्त बातमी प्रकाशित झाली होती. यावर शेवाळे यांनी वकील चित्रा साळुंखे यांच्या मार्फत ३ जानेवारी २०२३ ला नोटीस पाठवून या लेखातील दाव्यांचा स्त्रोत काय? अशी विचारणा केली होती. त्यावर, एका महिलेने इंटरनेटवर केलेला दावा आणि अन्य माहितीच्या आधारावर हा लेख लिहील्याचे सामनाकडून प्रत्युत्तरात सांगण्यात आलं. मुंबईतील शिवडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांना समन्स बजावत १४ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मानहानीचा दावा
शेवाळेंनी फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावाही दाखल केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिलेत.