ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा आज राज्यव्यापी मेळावा वरळीच्या एनएससीआय डोम येथे होत आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या पक्ष प्रमुखपदी पुन्हा एकदा निवड होणार आहे. तसेच, या मेळाव्यात ठाकरे काय बोलणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातून सहा हजारापेक्षा अधिक कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. हा मेळावा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. त्यात विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. दुपारी ४ वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मेळाव्यामध्ये संबोधित करणार आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणावर टीका करणार, आतापर्यंत भाजपने केलेल्या टीकेला काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल दिला आहे. आता १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. अशात ठाकरे गटाचा पहिल्यांदाच एवढा मोठा मेळावा होत आहे. त्यामुळेही या मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष आहे. आगामी निवडणुका, शिंदे-फडणवीस सरकारला होत असलेले एक वर्ष यासह विविध विषयांवर उद्धव ठाकरे अतिशय परखडपणे बोलणार असल्याचे सांगितले जाते.
शिवसेनेचा मेळावा विविध सत्रांमध्ये होणार आहे. यातील पहिल्या सत्राचे उद्घाटन हे युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. याच सत्रामध्ये उद्धव ठाकरे सरकारच्या कारभाराविषयी माहिती दिली जाणार आहे. खासकरुन तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये कोरोनावर कशी मात करण्यात आली यासंदर्भातील सादरीकरण केले जाणार आहे. आणि याच बाबी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरीत केले जाणार आहे. या मेळाव्यामध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यातील दुसऱ्या सत्रामध्ये संगीतकार राहुल रानडे आणि सहकलाकार हे ‘शिवसेनेचा पोवाडा’ सादर करणार आहेत. या सत्रामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांचे मार्गदर्शन होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नक्की काय निकाल दिला आहे यासंदर्भातील माहितीही या मेळाव्यात दिली जाणार आहे. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार किती गलथान आहे आणि सर्वसामान्यांना त्याची कशी झळ पोहचत आहे यावरही या मेळाव्यात उहापोह केला जाणार आहे. या मेळाव्यामुळे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मोठी ऊर्जा मिळावी आणि या सर्वांनी आगामी काळात जनतेपर्यंत या सर्व बाबी पोहचाव्यात असाही या मेळाव्यामागील उद्देश आहे.