नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाची शिवसेना कुणाला उमेदवारी देणार याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. नाशिक दौऱ्यात त्यांनी गोडसेंचा चांगलाच समाचार घेताना ठाकरे गटाच्या पुढील उमेदवाराला चाल दिली आहे.
खासदार राऊत म्हणाले की, हेमंत गोडसे यांनी स्वतःची कबर स्वतःच खोदून घेतली. त्यांचे डिपॉजिटही वाचेल की नाही माहित नाही, काय विजय, असे विजय करंजकर यांच्याकडे बोट दाखवून पत्रकारांच्या प्रश्नाला आपल्या खास शैलीत उत्तर देणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातून करंजकर हे सेनेचे उमेदवार असतील, असे संकेतच दिले.
कांदे, भुसेंना हे पर्याय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्या-त्या मतदार संघात बंडखोर आमदार-खासदारांना पर्यायी उमेदवारांचा शोध ठाकरे गटाने सुरु केला आहे. नांदगाव मतदारसंघात आमदार सुहास कांदे यांना शह देण्यासाठी जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष गणेश धात्रक यांना तर मालेगाव मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसे यांना प्रतिस्पर्धी म्हणून बंडूकाका बच्छाव यांचा विचार ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे लोकसभेच्या नाशिक मतदार संघात विजय करंजकर हे गोडसे यांच्या विरोधात पर्यायी उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु असल्याचे राऊत यांच्या वक्त्यव्यातून पुढे आले आहे.
करंजकर यांना हुलकावणी
करंजकर हे ठाकरे गटाचे एकनिष्ठ मानले जातात. शिवसेनेतून दरम्यानच्या काळात कितीही जण बाहेर पडले तरीही करंजकर मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिले. याच करंजकर यांनी २०१४ मध्ये नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण ऐनवेळी गोडसे यांनी मनसेतून सेनेत प्रवेश केला आणि करंजकर यांचा भ्रमनिरास झाला. कारण सेनेत प्रवेश करताच गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार होण्याच्या संधीनेही त्यांना हुलकावणी दिली. बारा आमदार नियुक्त करण्याच्या यादीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केराची टोपली दाखवली. राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर तर ही यादी गुंडाळून ठेवण्यात आली. त्यामुळे मागच्या दाराने आमदार होण्याचे त्यांचे स्वप्नही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे खासदारकी आणि आमदारकीने त्यांना चांगलीच हुलकावणी दिली आहे.
करंजकर भगूरचे
विजय करंजकर हे भगूरचे आहेत. तर, हेमंत गोडसे हे सुद्धा देवळाली कॅम्प परिसरातील आहेत. म्हणजे, गोडसेंच्याच भागातील उमेदवार ठाकरे गटाकडून देत जोरदार टश्शन देण्याचा प्रयत्न होणार आहे. विजय करंजकर आणि त्यांची पत्नी या दोघांनीही भगूर नगरपालिकेचे नेतृत्व केले आहे. शिवाय पक्ष संघटनेत करंजकर यांचे योगदान मोलाचे आहे. अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. शिवाय ते अतिशय आक्रमक म्हणून ओळखले जातात.
आगामी लोकसभा निवडणुकीत मात्र करंजकर यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेत दस्तुरखुद्द राऊत यांनीच दिले आहेत. शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटात गेलेल्या गोडसे यांच्या संबंधित प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या विकास कामांचे उदघाटन गोडसे यांच्या हस्ते केले जाते. यावर राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर देताना गोडसे यांनी स्वतःची कबर स्वतःच खोदली, असा टोला मारत त्यांचे डिपॉजिटही वाचेल की नाही माहित नाही, काय विजय, असे करंजकर यांच्याकडे कटाक्ष टाकत सांगितले. राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या आगामी लोकसभा निवडणुकीत करंजकर हे नाशिक मतदार संघातून सेनेचे उमेदवार असतील, असेच दर्शविले. करंजकर यांनीही राऊत यांच्या वक्तव्याला स्मित हास्य करीत दाद दिली.
राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले
नाशिक लोकसभा मतदार संघात यापूर्वी शिवसेना विरोध राष्ट्रवादी, असाच सरळ सामना आतापर्यंत रंगला आहे. गोडसे यांनी दस्तुरखुद्द छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा पुतण्या समीर यांनाही धूळ चारली आहे. आता हेच गोडसे शिंदे गटात गेल्याने उमेदवार शोधण्याची वेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर आली आहे. त्यामुळेच करंजकर यांचे नाव पुढे आल्याचा अंदाज बांधला जात आहे. दुसरीकडे राऊत यांनी महाविकास आघाडी भविष्यातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने या मतदारसंघावर आधीच दावा करून राष्ट्रवादीचे टेन्शन वाढविले आहे.
Politics Shivsena Thackeray Group Loksabha Candidate