मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे राज्य सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनातून मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटावर फटाके तथा बॉम्ब फोडण्यात येत आहेत. शिंदे गटातील ४० आमदार हे गद्दार असून त्यांनी खोकी घेऊन पक्षाशी गद्दारी केली असे म्हटले जात असताना केवळ काही आमदारांच मंत्रिपदे मिळाल्याने सुमारे २२ आमदार नाराज असून देखील कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जातील, अशी सामनामध्ये टीका करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार व कार्यकर्त्यांना भाजपने ईडीच्या जाळ्यातून वाचवले, मात्र आता त्या सर्वांना कायमचे गुलाम करुन टाकले आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे सर्व निर्णय घेतात आणि मुख्यमंत्री शिंदे ते जाहीर करतात, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते, पण भाजपनेच ते टाळल्याचेही सामन्यातून म्हटले आहे.
खरे म्हणजे शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसले त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, यावर एक नेता म्हणाला ‘शिंदे यांचा रामदास आठवले होईल’ हे विधान बोलके आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, असेही सामनातून स्पष्ट केले आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, “शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल आणि त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील’. असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.
तिकडे देशाच्या राजधानीत शिंदे वारंवार चक्र मारतात त्यांना कोणी भेटत नाही, तेथे शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
तसेच राज्यात ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे.
पोलिसांच्या बदल्यांत व आपले अधिकारी नेमण्यात त्यांना जास्त रस आहे. कारण, त्यांच्या ४० आमदारांना ते सर्व करून हवे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपाने या किरकोळ कार्यात गुंतवून ठेवले आहे असा टोलाही ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना लगावला आहे. भारतीय जनता पक्षाच्या मेहेरबानीवर त्यांचे मुख्यमंत्रीपद टिकून आहे व शिंदे यांचे राजकीय अस्तित्व त्या मुख्यमंत्रीपदावरच टिकून आहे. त्यामुळे भाजप शिंदे यांना गुदगुल्या करीत मारेल.
मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व त्यांच्या गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनास अवतरले. मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो. तसेच शिवसेनेने राज्यपालांवरही टीका करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. मात्र राज्यपालांनी आज शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल घेतलेली नाही.
Politics Shivsena Shinde Group MLA Upset