मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना कुणाची तसेचे बाहेर पडलेल्या आमदारांचे काय, या सर्वांशी संबंधित मुद्द्यांवर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान आपात्रतेवरील प्रकरणाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा जीव भांड्यात पडला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या आमदाराच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे आपल्या आदेशात म्हटले आहे. त्या अंतर्गत संबंधित सर्वांना नोटीसी पाठविणे, त्यांचे बयाण नोंदवून घेणे आदी बाबी सुरू आहेत. अशातच शिंदे गटातील आमदार अपात्र होण्याचे संकेत आहेत. काही राजकीय तज्ज्ञांनी तसे अंदाज व्यक्त केले आहेत. सत्तेतील अजित पवारांच्या सहभागाने हा दावा सत्यात उतरणार की काय, अशीदेखील भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशात आता अपात्रतेवरील सुनावणीला मुदतवाढ मिळाली आहे.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा दावा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
४० आमदारांचे नोटीसीला उत्तरंच दिले नाही
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या आमदारांना नोटीस बजावत उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानुसार काही आमदारांनी आपली बाजू मांडत नोटिसीला उत्तर दिले. मात्र, काही जणांनी या नोटिसीला उत्तर दिले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.