मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या राजकारणाचीच सतत चर्चा सुरू असताना शिंदेंची शिवसेना आतून घुसमटतेय, याकडे कुणाचे लक्षच गेले नाही. आजही दोन मोठ्या विभागांमधील शेकडो पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फारशी दखल घेतलेली नाही, असे कळते.
एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसोबत सत्तेतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ तर सोडलीच शिवाय शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्हही ते सोबत घेऊन आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांच्यासोबत शिंदे शिवसेनेत दाखल झाले. मात्र वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांची अवहेलना होताना दिसत आहे. अलीकडेच कांदिवली, मालाड आणि चारकोप या भागातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या चिरंजीवांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देण्याची तयारी केली. त्यानंतर आता जोगेश्वरीमध्येही तसाच रोष दिसत आहे. येथेही विभागप्रमुखांच्या त्रासाला कंटाळून शेकडो पदाधिकारी राजीनाम्याचे अस्त्र काढून तयार आहेत.
जोगेश्वरी पूर्व येथील विभाग क्रमांक चारचे प्रमुख विजय धिवार आणि महिला विभाग प्रमुख शिल्पा वेले यांच्या त्रासाला पदाधिकारी कंटाळले आहेत. येथील शाखाप्रमुख प्रकाश शिंदे यांनी आता यापुढे मनमानी सहन करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. थेट राजीनामा देऊनच प्रश्न सुटणार असेल तर तशी तयारी पदाधिकाऱ्यांची आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा संघटक अॅड. सुरेखा सुर्वे यांनी तर धिवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलांशी अत्यंत अश्लाघ्य भाषेत ते बोलतात, असे त्यांनी म्हटले आहे.
आत्महत्या करावीशी वाटते
विजय धिवाल आणि शिल्पा वेले यांच्या छळामुळे आम्हाला आत्महत्या करावीशी वाटेत, अशी प्रतिक्रिया जोगेश्वरी पूर्वमधील विभाग व शाखा संघटक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे गजानन किर्तीकर यांनी अकार्यक्षम पदाधिकारी बदलून एकनाथ शिंदे यांनी चांगल्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Politics Shivsena Shinde Faction Leaders Resignation Mumbai
Office Bearers