मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात दौरे करीत आहेत. सभा, मेळाव्यांद्वारे ते आपली शिवसेनेतून बाहेर पडण्याची भूमिका स्पष्ट करीत आहेत. दुसरीकडे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील राज्याच्या अनेक भागाचा दौरा करीत आहेत. गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन करीत आहेत. आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला शह देण्यासाठी जबरदस्त नियोजन केले आहे. याचीच सुरुवात ते शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यातून करणार आहेत.
शिवसेनेच्या बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी तसेच डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पुढील तयारी करण्यात आली आहे. दसऱ्याला शिवाजी पार्कवर मेळावा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओखळल्या जाणाऱ्या ठाणे येथील टेंभी नाका येथे ९ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेचेही कसून नियोजन केले जात आहे. ठाण्यातच शिवसेना भवन आहे. त्यामुळे शिंदेंना धडकी भरविण्यासाठी या सभेची रणनिती आखली जात आहे.
विशेष म्हणजे ठाण्यातील टेंभी नाका येथे संध्याकाळी जाहीर सभेनंतर राज्यभरात शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे राज्यातील प्रामुख्याने पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर आदी शहरांमध्ये जाहीर सभा घेणार असून सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची ‘महाप्रबोधन यात्रा’ जाणार आहे. या महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेनेच होणार आहे. तसेच या दौऱ्यात ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे सुध्दा त्यांच्या सोबत असतील, तसेच ठाकरे यांच्या सभांना जास्तीत जास्त गर्दी जमावी म्हणून शिवसेना नेते व कायकर्ते आतापासूनच कामाला लागले आहेत, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात येते.
Politics Shivsena Rebel Shinde Group Uddhav Thackeray Planning