मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत कधीकाळी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. ‘जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात लहान भाऊ आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे नसतील त्यानंतर हिंदुत्वाच्या या युतीत भाजप क्रमांक एकचा पक्ष होईल आणि शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष असेल,’ असे प्रमोद महाजन एका मुलाखतीत म्हणाले होते. सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता त्यांच्या त्या वक्तव्याची आठवण आवर्जून होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच प्रमोद महाजन यांनी शिवसेनाबाबत केलेल्या एका भविष्यवाणीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.
बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजप आणि शिवसेनेची महाराष्ट्रात युती झाली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना युतीचे शिल्पकार मानले जात होते. मात्र २०१४ ला पहिल्यांदा युती तुटली. या पार्श्वभूमीवर राजदीप सरदेसाई यांनी २० वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांनी केलेल्या वक्तव्याच्या आठवणीला उजाळा दिला आहे.
काय म्हणाले होते महाजन?
मुंबईचे तत्कालीन शेरीफ नाना चुडासमा यांच्या घरी सुरू असलेल्या पार्टीमध्ये पार्टीत प्रमोद महाजन यांना विचारण्यात आले की, ‘दिल्लीत तुम्ही क्रमांक एकचा पक्ष आहात आणि वाजपेयींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवत आहात पण महाराष्ट्रात तुम्ही लहान भाऊ आहात. तुमचा मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यावर महाजन म्हणाले, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात लहान भाऊ आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे नसतील त्यानंतर हिंदुत्वाच्या या युतीत भाजप क्रमांक एकचा पक्ष होईल आणि शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष असेल.’
Politics Shivsena Pramod Mahajan Prediction