जगळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला, याच निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद झाले आणि आता शिवसेनेसाठी आणखी एक धक्कादायक वृत्त आहे. शिवसेनेच्या एका आमदाराची थेट आमदारकीच धोक्यात आली आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (नंदुरबार) यांनी दिला असल्याने आता त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.
लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्रबाबत चोपड्याचे माजी आमदार जगदीश रमेश वळवी आणि अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार केली होती. सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे म्हणत रितसर तक्रार त्यांनी नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. समितीने चौकशीकरुन प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला आहे. आमदार सोनवणे यांनी सादर केलेले उपविभागीय अधिकारी (अमळनेर) यांनी निर्गमित केलेले टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचेदेखील समितीने आदेश केले आहेत.
हायकोर्टात धाव
समितीच्या निर्णयाविरुद्ध आमदार लता सोनवणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. औरंगाबाद खंडपीठात त्यासाठी रीट याचिका दाखल केली होती. कोर्टाने ३ डिसेंबर २०२०ला समितीचा आदेश रद्दबातल करुन आमदार सोनवणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणजेच अमळनेरचे उपविभागीय अधिकारीकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले होते.
कोर्टाच्या या आदेशानंतर आमदार सोनवणे यांनी सक्षम प्राधिकारीकडून जातीचे प्रमाणपत्र मिळवले. त्यानंतर ते पुन्हा समितीकडे पाठवले. पण समितीकडे पाठवलेल्या काही कागदपत्रांमध्ये नवे दस्ताऐवज होते. त्यामुळे त्याची सत्यता तपासणीसाठी हे प्रकरणं पोलीस दक्षता पथकाकडे वर्ग करण्यात आले होते. पोलिस दक्षता पथकाने तपासास सुरुवात केली पण आमदार सोनवणे तिथे टोकरे कोळी जातीचेच असल्याचे सिद्ध करु शकल्या नाहीत. म्हणून हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून न्यायप्रविष्ट आहे.
आता, सोनवणे खंडपीठाने याचिका फेटाळल्यानतंर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. तशी तयारीही त्यांनी सुरु केल्याचे सांगितले जात आहे.