जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिल्याने राज्यभरात याची चर्चा होत आहे. तसेच, महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप तसेच टीका-टिपण्णी करीत असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यात होते. त्याचवेळी एका कार्यक्रमात ते नाथाभाऊ म्हणजेच एकनाथ खडसेंवर बरसले. माझ्या जिल्ह्यात एकनाथ खडसे सारखा डाकू असल्याचे वक्तव्य गुलाबराव यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार नाथाभाऊ यांनी घेतला आहे. ‘चोरों को सारे नजर आते है चोर’ असा खोचक शेर म्हणत खडसेंनी पलटवार केला आहे.
अहमदनगर येथील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ‘आमच्या जिल्ह्यात एकनाथ खडसेंसारखा डाकू बसला आहे’ अशी जहरी टीका गुलाबरावांनी केली होती. त्यावर खडसेंनी नशिराबाद येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार केला. गुलाबराव यांसारख्या उच्चशिक्षित, निर्व्यसनी आणि कर्तव्यपर अशा स्वरूपाचे मंत्री महोदय एकनाथ खडसे आमच्या जिल्ह्यात दाखवा, असं म्हणतात. मला वाटतं अशा निर्व्यसनी माणसाविरुद्ध न बोललेलं बरं ‘चोरो को सारे नजर आते है चोर’ अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, नाथाभाऊ आणि गुलाबराव वादात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी बोलताना पालकमंत्री गुलाबराव यांची वारंवार जीभ घसरते. त्यांच्या बोलण्यातून नेहमीच आकस दिसून येतो. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडे लोटांगण घालतानाचे उदाहरण लपून राहिलेले नाही. पालकमंत्र्यांना आघाडी धर्माचा विसर पडतो की काय? भाजप नेत्याने जशी चावी फिरवली तसे गुलाबराव पाटील हे नाचतात, अशी शंका राष्ट्रवादीने उपस्थित केली आहे. खडसेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जळगाव महानगराध्यक्ष लाडवंजारी यांनी दिला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.