मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे त्रस्त असलेल्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात सामील व्हायचे होते. मात्र त्यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे प्रवेश थांबला होता. शुक्रवारी दुपारी त्यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले आणि रात्री त्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक स्थानिक नेते शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेतील नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याआधी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता सातमकर यांनीदेखील साथ सोडणे हा ठाकरे गटाला धक्का असल्याचे मानले जात आहे. पण त्यापूर्वी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप मागे घेण्यात आले आहे.
मंगेश सातमकर हे जुने शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. १९९४ मध्ये ते मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर सायन कोळीवाडा विभागातून २००२ मध्ये पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत निवडून गेले. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती आदी विविध समित्यांमध्ये त्यांनी काम केले. मागील मुंबई महापालिकेच्या कार्यकाळात ते शिक्षण समितीचे अध्यक्ष होते. दरम्यान, त्यांच्यावर त्यांच्याच कार्यालयातील एका तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यामुळे ते अडचणीत होते. शुक्रवारी संबंधित तरुणीने आपला आरोप मागे घेत सातमकर यांना क्लिन चिट दिली.
एकाच कार्यालयातील सहकारी
सातमकर यांच्यावर एका २९ वर्षीय तरुणीने दोन महिन्यांपूर्वी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. अँटॉप हिल पोलीस ठाण्यात मंगेश सातमकर यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार करणारी तरुणी सातमकर यांच्यासोबत काम करणारी होती. सातमकर यांनी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप तरुणीने केला होता. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तरुणीने पोलीस ठाण्यात सातमकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
आम्ही चुकलो
तरुणीने आरोप मागे घेताना आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, आम्ही एकाच क्षेत्रात कार्यरत असल्याने आमच्या दोघांमध्ये वाद झाले होते. मात्र, आता आम्हा दोघांनाही आपली चूक झाली असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचे ठरवण्यात आले आहे. ही तक्रार मागे घेण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचे तरुणीने म्हटले आहे.