मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतरही शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत वादांमुळे कमालीची अस्वस्थ आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे आणि दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत राहूनही आतले वाद संपत नाहीत, अशी शिंदे गटाची अवस्था आहे. अलीकडेच रामदास कदम यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत वाद घातल्याची बाब पुढे आली आहे.
मुंबईतील अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि गोरेगाव येथील ३०० नाराज पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री रामदास कदम यांची तक्रार केली. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून कांदिवली, चारकोप आणि मालाड येथील ४० पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सोपविले होते. ही घटना ताजी असतानाच आता रामदास कदम यांची तक्रार घेऊन ३०० पदाधिकारी शिंदेंकडे पोहोचले आहेत.
रामदास कदम बैठकींमध्ये शिविगाळ करतात, पक्षातून काढून टाकण्याची धमकी देतात. आम्ही त्यांच्या त्रासाला कंटाळलो आहोत, असे या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना सांगितले. मुख्य म्हणजे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. शिंदे यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर हे सर्व पदाधिकारी माझ्याकडे भेटीला आले आणि त्यांनी रामदास कदम यांच्या वागणुकीबद्दल सांगितले, असे कीर्तीकर यांनी पत्रकारांना सांगितले. पण त्याचवेळी या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेले रामदास कदम यांनी थेट वर्षा निवासस्थान गाठले.
शिंदे, सामंतांना सुनावले
रामदास कदम यांनी वर्षा निवासस्थान गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तुम्हाला दिलेली तीन कामे सुद्धा केली नाहीत, अशी तक्रार ते शिंदंकडे करत होते. त्यावर समजूत काढण्याचा शिंदे प्रयत्न करत होते. तर उदय सामंत यांनी अँटी चेंबरमध्ये बसून चर्चा करण्याचा सल्ला दिला. तर रामदास कदम यांनी त्यांनाही सुनावले.
Politics Shivsena Eknath Shinde Faction Ramdas Kadam
Varsha Bungalow Mumbai Office Bearers Leader