मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाशी काडीमोड घेऊन सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे गटात दररोज काहीतरी घडामोडी घडत असतात. कधी पदांवरून तर कधी महत्त्व कमी झाल्यावरून, नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये सातत्याने खटके उडत असतात. अशाच एका प्रकरणात अकोल्यातील एका नेत्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवून सत्ता स्थापन केली. पण शिंदेंसोबत आलेले राज्यभरातील नेते आणि पदाधिकारी मात्र एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळेच अकोल्याचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यांना देण्यात आलेलं महत्त्व बघून अनेकांनी नाराजीचा सूर आळवला. त्याकडे दुर्लक्ष करीत शिंदे यांनी बाजोरियांकडे संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून सातत्याने कुठले ना कुठले वाद अकोल्यात होत आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे या वादाने त्रस्त आहेत. त्यामुळे आता त्यांनी याची गंभीर दखल घेत बाजोरियांची संपर्कप्रमुखपदावरून हकालपट्टी केली. आपल्या हिताच्या लोकांना पक्षात विशेष स्थान देत असल्याचा आरोप बाजोरिया यांच्यावर होत होता. याशिवाय त्यांच्यावर कमीशन घेत असल्याचाही आरोप होत आहे. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप तक्रारी यालाच कंटाळून मुख्यमंत्र्यांनी बाजोरियांकडून जबाबदारी काढून घेतली.
जाधवांच्या खांद्यावर धुरा
बाजोरियांची उचलबांगडी केल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांच्या खांद्यावर अकोला जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रतापराव जाधव यांच्यावर आधीपासून बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी आहे. आता त्यांना दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्णवेळ लक्ष ठेवावे लागणार आहे.
बाजोरियांवर गंभीर आरोप
गोपिकिशन बाजोरिया यांच्यावर स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून आलेला १५ कोटींचा विशेष निधी बाजोरियांनी स्वतःच्याच प्रकल्पांमध्ये वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना लिहीलेल्या पत्रात बाजोरियांचा उल्लेख कमीशन एजंट असाही केला आहे.
Politics Shivsena Eknath Shinde Action Internal Dispute