मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीप्रदर्शनासाठी बीकेसी येथे दसरा मेळाव्याची सभा घेतली. या सभेत हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. पण आता हीच सभा शिंदे गटाच्या अंगलटी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण शिंदे गटाने या सभेसाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी जूनमधील बंडखोरीनंतर शिंदे गटाला कुठे अडचणीत पकडता येईल, याचा ठाकरे गटाकडून सातत्याने प्रयत्न होत असतो. जूनमध्ये बंडखोरी केल्यानंतर दसरा मेळावा प्रतिष्ठेचा मानला जात होता. त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये झाला. दोन्हींचे शक्तीप्रदर्शनाचे प्रयत्न होते. आरोप-प्रत्यारोप झाले. पण शिंदे गटाने बीकेसीमध्ये सभा घेण्यासाठी दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचा दावा करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते दीपक जगदेव यांनी दाखल केली आहे.
अॅड. नितीन सातपुते त्यांची बाजू लढवत आहेत. पूर्वी रिट याचिका म्हणून दाखल करण्यात आली होती. मात्र संबंधित विषय जनहित याचिकेचा असल्याचे निरीक्षण नोंदवत त्यानुसार प्रक्रिया करण्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपिठापुढे ही याचिका आली आहे. याचिकेची गंभीर दखल घेण्यात आली असून २२ जूनला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
प्रवाश्यांची गैरसोय
बीकेसीतील दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचा वापर केला. या बसेसच्या माध्यमातून हजारो लोकांना सभेच्या ठिकाणी आणले गेले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांची गौरसोय झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. जवळपास दोन दिवस या बसेस शिंदे गटाच्या सभेसाठी व्यस्त होत्या.
एकनाथ शिंदेंना अटक करा
नोंदणी नसलेल्या पक्षाने राजकीय सभेवर १० कोटी रुपये खर्च केलेच कसे, असा सवाल उपस्थित करीत उधळपट्टीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
Politics Shivsena Dasra Melava Expenses Petition Court