मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गटाने अर्ज केला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने त्यास अद्याप मंजुरी दिलेली नाही. तर, बंडखोर शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मेळावा घेता येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कवर झालेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘हा बाळ मी आज तुम्हाला दिला’ असे उद्गार काढले. तेव्हापासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरू झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रचंड प्रयत्न केले आणि त्याला यशही मिळाले. या यशात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या वाटा मोठा आहे, असे म्हटले जाते. किंबहुना शिवसेनेचा दसरा मेळावा ही जणू काही परंपराच बनली आहे. परंतु आता शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा कशा पद्धतीने होईल यासंदर्भात चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा असे एक अतूट नाते असून, या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उपस्थिती लावतात.
मात्र यंदा दि. ५ ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला असताना, महापालिकेने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याचे समजते. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याची संधी शिवसेनेला मिळणार, की एकनाथ शिंदे गटाला याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. यंदा मात्र या दसरा मेळावर काहीसे राजकारणाचे सावट दिसून येते, कारण एकीकडे उद्धव ठाकरे गटातील काही नेते शिवाजी पार्कमध्ये हा मेळावा आयोजित करण्यावरून शंका व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे स्वत: उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली की, परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे, तर भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी, स्व. बाळासाहेबांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आपणही दसरा मेळावा घेणार आहोत, अशी भूमिका स्पष्ट केली होती. इतकेच नव्हे, तर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याबाबतही शिंदे गट आग्रही आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शिवाजी पार्कच्या मैदानाची परवानगी अद्याप कुणालाही देण्यात आलेली आहे. अर्जांची छाननी, पाहणी, अहवाल मागवणे अशी प्रक्रिया सध्या सुरु आहे, मात्र दसरा मेळाव्याचा दिवस आता जवळ येऊ लागल्याने शिवसैनिकांचा धीर सुटत चालला आहे, त्यामुळेच ते आक्रमक झालेली दिसून येतात, साहजिकच आज दि. २० सप्टेंबर रोजी जी-नॉर्थ वॉर्डमध्ये शिवसेनेचे शिष्टमंडळ महापालिकेत परवानगीसाठी आपले म्हणणे आक्रमकपणे मांडणार आहे.
दसरा मेळावा व्हावा असा आग्रह आमच्या सर्वच कार्यकर्ते आणि नेत्यांचा आहे. त्यामुळे दसरा मेळावा होणारच असे, एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वाचा अवलंब करावा, असे सांगितले जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाली नाही, तर ते वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजन करण्याच्या तयारीत आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सांगितले. याबाबत आमदार भरत गोगावले म्हणाले की, आम्ही शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन ठिकाणी परवानगीसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळवताना शिवसेनेला आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यातच दसरा मेळाव्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवाजी पार्कवर मेळाव्याची परवानगी मिळाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. न्यायालयातूनही दिलासा मिळाला नाही तर शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा करण्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे नेते अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
Politics Shivsena Dasara Melava Permission BMC
Uddhav Thackeray Eknath Shinde Rebel